Tuesday, June 14, 2011

धर्म: एक दिशाहीन प्रवास

      धर्म या शब्दाची व्युत्पत्ती धृ या धातु पासून झालेली आहे.वेगवेगळ्या ग्रंथांत याच्या विविध व्याख्या दिलेल्या आहेत. 'धारणात धर्म इत्यार्हु धर्मो धारयाती प्रजा: '(महाभारत)

ज्यामुळे समाजाचे धारण केले जाते,किंवा प्रजेला जो धारण करतो तो धर्म .इथे धारण शब्दाचा अर्थ धरून ठेवणे,जोडून ठेवणे,बांधून ठेवणे असा घेता येईल.

'जगत स्थितिकारणम् प्राणिनां साक्षात अभ्युदयानि श्रेयस हेतुर्थ: स् धर्म:!' (शंकराचार्य)

जगताची वा विशिष्ट समुदायाच्या स्थितीचे कारण आणि आणि सर्व प्राणीमात्रांच्या अभ्युद्याच्यासाठी धर्म आहे.स्थिती म्हणजे ढळू न देणे ,स्थिर ठेवणे ,मेंटेन करणे.

'यस्मातधारयते सर्व त्रैलोक्यं सचराचरम्' जो संपूर्ण त्रैलोक्याला,चराचराला धारण करतो तो धर्म !

या व्याख्या अलीकडच्या म्हणजे महाभारत कालापासूनच्या आहेत.या काळापासून आजपर्यंतचा विचार करता त्या कितपत योग्य आहेत,याचाही विचार आपण करणार आहोतच. धर्म ही एक नियमावली असते त्या त्या समुहाने,संघटनेने आपसात कसे आचरण ठेवावे, कसे वागावे याचे नियम लिखीत वा अलिखित स्वरुपात असतात. आज जगात क्रिश्चन,मुस्लीम,हिंदू ,बौध्द, जैन, ज्यू असे प्रमुख धर्म आहेत. यात ख्रिश्चन धर्माची व्याप्ती सर्वाधिक असून मुस्लीम धर्म दुसऱ्या स्थानावर आहे. हिंदू हा आशियातील सर्वात मोठा धर्म आहे. धर्म कोणताही असो, त्यात काही समान तत्वे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे 'धर्म ' ही संकल्पना हाडामांसाच्या माणसांनी बनवलेली आहे.(नंतर त्या त्या धर्माच्या कर्त्यास ईश्वर,प्रेषित ,दूत वगैरे विशेषणे लावली गेली.).सर्व धर्मांमध्ये चोरी,व्यभिचार,भ्रष्टाचार,असभ्यता या गोष्टी निषिद्ध आणि दंडनीय मानल्या आहेत. ईश्वर ह्या संकल्पनेला जवळपास सर्वच धर्मांनी अधिष्ठान मानले आहे,आणि ईश्वराला न मानणाऱ्यांना नास्तिक म्हटले असून त्याचा निषेध केलेला आहे वा त्यासाठी कठोर शिक्षाही ठोठावल्या आहेत.प्रत्येक धर्मात धर्म स्थापन करणाऱ्यांच्या मृत्यूनंतर अनुयायांच्या विचारातील दुहीमुळे वा इतर कोणत्या कारणाने वेगळे पंथ निर्माण झाले आहेत. काही धर्मांमध्ये तत्कालीन बलिष्ठ धर्मानुयायांनी(?) स्वतःच्या फायद्यासाठी मूळ लिखीत वा अलिखीत संहितेत बदल केले होते.आणि त्याचा फायदा स्वतः,आणि पुढच्या स्वताच्या अनेक पिढ्यांना करून दिला. आणि पुढेही तोच पायंडा चालत रहावा म्हणून धर्मातील निर्बल वर्गावर कठोर बंधने लादण्यात आली. उदा. हिंदू धर्मात चार वर्ण निर्माण झाले .प्रत्येक वर्गासाठी वेगळे नियम होते.क्षुद्र लोकांना एकाच प्रकारच्या गुन्ह्यासाठी इतर वर्गांपेक्षा अधिक कठोर शिक्षा ठोठावली जात असे. स्त्रियांना स्वातंत्र्य जवळपास नव्हतेच.मुस्लीम धर्मात अजूनही स्त्रियांवर अनन्वित अत्याचार पाकिस्तान वा तत्सम कट्टर मुस्लीम राष्ट्रांमध्ये होत आहेत आणि त्या संबंधातील बातम्या आपण रोज पहातो,वाचतो आहोत. अमेरिकेच्या इतिहासातही स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता आणि त्यासाठी त्यांना लढा द्यावा लागला वगैरे.हे सर्व इथे लिहिण्याचे कारण कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्यासाठी नसून केवळ सत्याचा मागोवा घेण्यासाठी आहे ,हे जाणकारांनी लक्षात घ्यावे.


                वरील सर्व मुद्द्यांवरून धर्माची सोपी व्याख्या करावयाची झाल्यास ती याप्रमाणे करता येईल." धर्म ही त्या त्या समाजापुरती आचारविचार,ईश्वरोपासना, श्रद्धा,अंधश्रद्धा,विधी,( किंवा विधी वा  कर्मकांडविरहीत)  इत्यादींच्या निमित्ताने आणि अंतर्गत विरोधाभास वा मतभिन्नता असूनही समाजाला जोडून ठेवण्यासाठी केलेली समानता ,मानवता आणि नैसर्गीक न्यायावर आधारित नियमावली आणि जीवनपध्दती आहे. ज्यात त्या त्या नियमांचे पालन करणे त्या धर्मातील व्यक्तीस बंधनकारक असते."
आता हे सर्व आजच्या सर्व धर्मांमध्ये तेव्हाच घडू शकेल जेव्हा असे धर्म समानता,मानवता आणि नैसर्गीक न्यायाच्या पायावर उभे असतील. दुर्दैवाने आज असे म्हणावे लागते की असा कोणताही ज्ञात धर्म नाही की ज्यामुळे समाजात रक्तपात झाला नाही.
        

माझ्या मते "धर्म" ही संकल्पना व्यक्ती,समाज,संघटना,देश आणि काल "सापेक्ष" असते. कारण विचार हे व्यक्तीगणिक भिन्न असतात. समाजातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्यात' समान' हितकर घटक नसल्यास,जरी त्या धर्मामुळे तो विशिष्ट मानवसमूह काही काळापुरता एकसंध असला,टिकून असला तरी सर्वकाली तो तसा राहणे कदापी शक्य नसते. त्यामुळे धर्म ही संकल्पना त्याच्या व्याख्येनुसार समाजाचे केवळ एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच धारण करू शकते.काळानुसार जसजसा समाज प्रगल्भ होत जातो,तसतसे मूळ धर्मसंहितेत बदल अपरिहार्यपणे करावे लागतात.ते तसे न केल्यास तो धर्म अधिक काळ तग धरू शकत नाही. ज्या धर्मात समानता,मानवता,अहिंसा यांचे स्थान डळमळीत असते,त्यात अनेक पंथ,जाती निर्माण होतात आणि अंतर्गत कलहामुळे असा धर्म व त्यांचे अनुयायी काळाच्या ओघात नामशेष होतात!"

मग आजच्या विविध धर्मांचे उद्याचे भवितव्य काय? असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. आज आपण धर्म ,पंथ,जाती,समाज आदी मुद्द्यांवरून चाललेला कलह आणि त्याचे दुष्परिणाम पाहतो आणि भोगतो आहोत.आधुनिक जगात अतिरेकी आणि धर्मांध दहशतवादी यांची धर्मावरची पकड घट्ट होते आहे. आणि त्यामुळे इतर धर्माच्या लोकांनाही स्वतःच्या अस्तित्वाबद्दल चिंता वाटू लागली आहे. म्हणून त्यांनीही स्वताच्या अस्तित्वासाठी दहशतवादाचा आश्रय घ्यावा का? तर नाही! कारण आपणही तसेच करू लागलो तर अखिल मानवी जमातीलाच संपवण्यासारखे होईल. यावर उपाय आहे आणि तो म्हणजे मानवता धर्माचा पुरस्कार करणे! भारत निधर्मी राष्ट्र आहे. भारत ना केवळ हिंदूंचा,ना मुस्लिमांचा,ना शिखांचा ना जैनांचा ना बौद्धांचा वा आणखी इतर कोणत्या धर्माचा! मानवता हाच आपला धर्म आहे. त्याचे शिक्षण आपल्या पुढच्या पिढीला सुरुवातीपासूनच दिले पाहिजे. आपल्या भारतापुरते बोलायचे झाल्यास भारतीय संविधान ही भारतीय नागरिकांच्या जीवनाची नियमावली आहे ,आपल्या जगण्याची शैली आहे यानुसार प्रत्येक भारतीयाने या नियमांचे पालन केल्यास आणि संविधानालाच आपला धर्म मानल्यास आपल्याइतके सुखी संपन्न राष्ट्र कोणतेच नसेल पण....
....पण हे शक्य नाही कारण आम्ही आमच्या बिनबुडाच्या तथाकथित धर्मिक कल्पनांना चिकटून आहोत.हजारो वर्षांपासून आमच्या धर्मात अनेक  विरोधाभास असूनही आमचा पीळ जात नाही. कारण बलवानांनी दुर्बलांना छळायचे हा इथला लिखित/अलिखित नियम बनला आहे.जो आम्ही आमच्या स्वार्थासाठी सोडायला तयार नाही."असेल भारत कागदोपत्री निधर्मी राष्ट्र- पण आम्ही नाही ना! आम्ही कधी मनात तर कधी उघडपणे जातीधर्माची श्वापदे पाळतो;बोला काय म्हणायचं आहे? आमची सवय आहे ती पिढ्यापिढ्यांची! आमच्या रक्तात भिनत आलेले हे विषारी विखारी संस्कार पिढ्यापिध्यांतून पाझरत आलेले आहेत. असतील आंबेडकर ग्रेट;लिहिली असेल सर्वात मोठी घटना. आम्हाला काय त्याचे? आणि तुम्ही कोण आम्हाला विचारणारे"? अशी अरेरावीची भाषा! ही कोणत्याही धर्मियांची असो,पण अधूनमधून अनुभवाला येतेच ना? 
सर्व  महत्वाच्या धर्मांमध्ये विसंगती आहेत. त्याचा थोडक्यात आढावा घेऊ-
१)मुस्लीम धर्म (कुराण) :मो.पैगंबरांना गाब्रीयेल या देवदुताने दिलेले हे संदेश आहेत असे मानले जाते. ते एका गुहेत ध्यान करीत तेव्हा त्यांना हे संदेश मिळत.काही लोकांच्या मते कुराण हे 'कॉकटेल ऑफ टेक्स्ट' आहे.कुराणाने म्हटले आहे की अल्ला हाच एक देव आहे.दुसरा कुणी देव नाही.थोडक्यात इथे एकेश्वरवाद आहे.मुस्लिमांमध्ये पैगंबरांच्या मृत्यूनंतर शिया आणि सुन्नी असे दोन पंथ निर्माण झाले.हे निर्माण होण्यामागे धार्मिक विवादापेक्षा पैगंबरांचा वारसा कुणाला मिळावा हा भाग जास्त होता.यात वारसा हक्क मागणारे शिया होते. झैन आणि उब्बय इब्न हे पैगंबरांचे शिष्य होते. त्यांच्याकडे वारसाहकक् आले. तेव्हापासून शिया अन् सुन्नी असा पंथभेद निर्माण झाला.आजमितीस शियांची संख्या १५% तर सुन्नी ८५% आहेत. पात्रीशिया क्रोन आणि मायकेल कुक यांच्या मते ७ व्या शतकापर्यंत कुराणाचे अस्तित्व नव्हते. या संदर्भात अनेक मतभेद आहेत. शहाद(अल्ला हाच देव), सलाली (प्रार्थना),जकात,उपवास,हाजी ही इस्लामची मुलभूत तत्वे आहेत. यात प्रार्थनेच्या संदर्भात शिया आणि सुन्नी यांच्यात मतभेद आहेत.सुन्नींच्या मते दिवसातून ५ वेळा तर शियांच्या मते दिवसातून ३ वेळा प्रार्थना करायला हवी. उपवासाच्या बाबतीत सुन्नींमध्ये रजस्वला स्त्रीला उपवास करण्याची परवानगी नसते.     कुराणात मात्र या संदर्भात प्रतिबंध नाही.
कुराणातील काही आक्षेपार्ह विधाने : 1)स्त्रीने आज्ञाधारकपणे वागावे. असे न  वागल्यास त्या स्त्रीच्या पतीने तिला आधी समजावून सांगावे,नंतर शारीरिक संबंध बंद करावेत आणि नंतर मारहाण(शेवटचा पर्याय) करावी.
2)याशिवाय अल्लाला न मानणाऱ्या लोकांविरुध्द आक्रमण करावे (?धर्मयुद्ध).काहींच्या मते हे मत कुराणातील नसून आपल्या धर्मावर आक्रमण करणाऱ्यांचा प्रतिकार करावा एवढाच त्याचा अर्थ आहे.
3)मुर्तीपुजकांना ते सापडतील तेथे ठार करा.ते शरण आले आणि त्यांनी नमाज कायम केले तर त्यांना सोडून द्या.नि:संशय अल्ला क्षमाशील व दयाळू आहे.
४)मूर्तीपूजक नापाक आहेत. 
५)काफिर हे नि:संशय तुमचे शत्रू आहेत.
६)काफिरांशी लढा द्या.
७)ज्यांनी आमच्या आयतांना नाकारले,त्यांना आम्ही लवकरच जाळून टाकू.
८)जे अल्लाशिवाय दुसऱ्या कुणाची पूजा करतील,ते नरकात जातील.
९)काफिर आणि मुनाफिक तुमचे शत्रू आहेत,त्यांना नरकात पोचवा.
१०)आमच्या आयती नाकारणाऱ्या लोकांचा हा सूड आहे.
११)हे लोकांनो,लढा उभारा.जर तुम्ही २० जण एकत्र आलात तर २०० लोकांवर प्रभुत्व गाजवाल.जर १०० असाल तर १००० काफिरांना भारी आहात.
१२)कपटी आणि काफिर नरकातील आगीत सदैव राहतील.
१३)यहुदी आणि इसाई यांना मित्र करू नका.

१४)आम्ही पुन्हा त्यांच्यामध्ये अखेरच्या दिवसापर्यंत वैमनस्य आणि द्वेषाची ज्वाला पेटवली आहे.आणि ते काय करत होते,हे अल्ला लवकरच त्यांना सांगेल.वगैरे वगैरे.


कोलकाता  कुराणविरोधात  अर्ज :(संदर्भ : v.sundaram रिटायर्ड आय.ए.एस. ऑफिसर)

१९८५ मध्ये कोलकाता हायकोर्टात चंदमल चोप्रा,हिमांशु कुमार ,सीतल सिंग यांनी वरील आक्षेपार्ह मुद्द्यांसंदर्भात  अर्ज दाखल केला .न्या. बिमलचंद्र बसक यांनी तो खारीज केला. यात बरेच राजकारण होते,असे म्हटले जाते. या संदर्भातील रिव्ह्यू पिटीशनही खारीज करण्यात आले.यानंतर १९८६ मध्ये सीताराम गोयल यांनी "दि कोलकाता कुरान पिटीशन" असे एक पुस्तक प्रकाशित केले.त्यात त्यांनी कुराण,व्होट बँक्स आणि राजकारण आदी गोष्टींचा उहापोह केलेला होता.यानंतर लगेचच काही हिंदूंनी कुराणातील २४ आक्षेपार्ह आयतींविषयी पोस्टर्स प्रकाशित केली.आणि भारतात जातीय दंगली उसळण्याचे हे कारण आहे:कारण अशा आयती मुस्लिमांना इतर धर्मियांविषयी द्वेष पसरविण्याचे काम करतात.त्यामुळे त्या कुराणातून काढून टाकल्याशिवाय जातीय दंगली थांबणार नाहीत, असे म्हटले होते.या पोस्टर प्रकारात राजकुमार आर्य आणि इंद्रसेन शर्मा या  दोन लोकांना ना अटक झाली होती.या प्रकरणावर निकाल देताना न्या.लाहोट यांनी म्हटले होते-
'It is found that the Ayats are reproduced in the same form as are translated in the said 'Quran Majeed'. In my opinion the writer by writing the above words has expressed his opinion or suggestion and at the most it can be branded as a fair criticism of what is contained in the holy book of Mohammedans'.. With due regard to the holy book of 'Quran Majeed', a close perusal of the Ayats shows that the same are harmful and teach hatred and are likely to create differences between Mohammedans on one hand and the remaining communities on the other. In view of the above discussion, I am therefore of the view that there is no prima facie case against the accused as offences alleged against the accused do not fall prima facie within the four corners of Sections 153-A/295-A of the Indian Penal Code and hence both of the accused are discharged'

इस्लाममध्ये मूर्तीपूजा हे धर्मविरोधी कृत्य मानले आहे. आता इथे थोडी विसंगती अशी दिसून येते,की मग मशीद,दर्गे वगैरे अल्लाची ठिकाणे कशासाठी बनविण्यात आली? आणि आजचे मुस्लिमधर्मीय जेव्हा एखाद्या मशिदीत प्रार्थना करतात,तेव्हा ती मूर्तीपूजा ठरत नाही का? हा प्रश्न वादासाठी नसून कोणास याविषयी काही सुयोग्य स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास कृपया दयावे. मला इतकेच म्हणावयाचे आहे की जो देव अमूर्त  आहे,त्याला मशीद इत्यादींची काय गरज? माझ्या मनात आणखी एक प्रश्न असा आहे,की जेव्हा लोक नमाज अदा करतात,तेव्हा त्यांना डोळे बंद केल्यावर अल्लाची प्रतीमा दिसते का? की ती एक अध्यात्मिक  शून्य  अवस्था असते?कारण  डोळे मिटले तरी डोळ्यांसमोर प्रतीमा येतातच.असो,हा मुद्दा अनुभूतीचा विषय असून सर्वांना सारखा लागू होणे शक्य नाही.
काही लोक असा दावा करतात की मो.पैगंबर हे शेवटचे प्रेषित होते.त्यांच्या पूर्वी हजारो प्रेषित होऊन गेले.मात्र आता पुन्हा दुसरा  प्रेषित निर्माण होणार नसल्यामुळे देवाने त्यांनी प्रकट केलेल्या ग्रंथाला  'अपरिवर्तनीय' ठेवले आहे;आणि त्यात आजपर्यंत किरकोळसुध्दा फरक झालेला नाही. आजचा ग्रंथ खरेच अपरिवर्तनीय राहिला आहे का? माझ्या मते कोणत्याच धर्माचे कोणतेच ग्रंथ अपरिवर्तनीय आहेत असे म्हणणे अत्यंत धाडसाचे होईल. या बद्दल वस्तुस्थिती अशी की पैगंबरांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनी तत्कालीन खलीफा व पैगंबरांचे जावई यांनी अनेकांजवळ असलेले कुराणाचे पाठभेद आणि प्रती एकत्र करून त्यातील प्रक्षिप्त भाग काढून टाकला.यात त्यांनी 'आयेशा' या पैगंबरांच्या पत्नीजवळील भागही नाकारला.यानंतर २५०-३०० वर्षांनी इब्ने मुक्ल,इब्ने मुसा,मुजाहीद या मुस्लीम संतांनी ते(कुराण) बगदादच्या गादीखाली पुन्हा प्रमाणित केले.
              आता काही लोक आक्षेपार्ह आयतींसंदर्भात असा दावा करतात,की त्या तत्कालीन परिस्थितीनुरूप योग्य होत्या.आणि जो मुळातून पैगंबरांचे चरित्र वाचेल,आणि कुराणाचा सखोल अभ्यास करेल त्यालाच या आयतींचा खरा अर्थ समजेल वगैरे;पण प्रथमदर्शनी वरील न्या.लाहोट यांच्या निकालावरून आपण आपल्या परिने निष्कर्ष काढू शकतो.

ज्यू धर्म:
हा  हिब्रू किंवा ज्यू लोकांचा धर्म आहे.यातही एकेश्वरवाद आहे.आणि 'जेहोवाह' हा एकमेव ईश्वर हे लोक मानतात.याहोवाहा हा ईश्वर त्याच्या लोकांच्या बाबतीत प्रेमळ आणि दयाळू असून इतर (देवाला मानणाऱ्या) लोकांचा तो बदला घेतो.
     ज्यू धर्म ई.स.पू. १३ व्या शतकात  'मोझेस' या प्रेषिताने पलेस्तैन इथे स्थापन केला.त्यावेळी हिब्रू समूहांच्या अनेक देवता होत्या.तत्कालीन राजा फारावो हा हिब्रू लोकांचा अत्यंत द्वेष करीत असे. त्याने कैक हिब्रू बालकांचे शिरकाण केले होते.त्यातून मोझेस बचावला.याने पुढे जाऊन हिब्रू लोकांना संघटीत केले. मोझेसला ईश्वराकडून १० आज्ञा प्राप्त झाल्या.आणि एकेश्वरवादाचा साक्षात्कार झाला. ज्यूंचा धर्मग्रंथ जुना करार मूळ  हिब्रू भाषेत असून तो नंतर ग्रीक आणि अगदी अलीकडे इंग्रजीत भाषांतरीत झाला. तो तनख स्वरूपात आहे. यात ज्यू लोकांची जीवनपद्धती,नीतिनियम,काव्य,दंतकथा,वैद्यक तसेच ज्योतिष आदी गोष्टीं समाविष्ट आहेत.याशिवाय जुन्या करारात विश्वाची उत्पत्ती,आदमने केलेली ईश्वरी अवज्ञा,त्यामुळे त्याला झालेली शिक्षा,मोझेसचे महात्म्य,भरकटलेल्या ज्यू लोकांना मार्गावर आणण्यासाठी ईश्वराने योजलेल्या घटना,त्याचा उद्देश वगैरेंचा उल्लेख आहे.इस्त्रायल या शब्दाचा उल्लेख प्रथम हिब्रू बायबलमध्ये आढळतो. 'जेकब'चे एका विचित्र अतिमानवी शक्तीशी मल्लयुद्ध झाल्यानंतर त्याला इस्रायल हे नाव मिळाले.आणि त्याच्या कृपाछायेत जे लोक वाढले,त्यांना इस्रायली असे म्हटले गेले. इस्रायल शब्दाचा अर्थ देवाभीमुख असा आहे. सोलोमन,अब्राहम,डेव्हिड,(अपभ्रंश: सुलेमान,इब्राहीम,दाउद) या तीन महान पुरुषांचा ज्यू,ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मात उल्लेख आहेत आणि त्यांना आदरणीय मानलेले आहे.ज्यू धर्म हा ख्रिश्चन आणि मुस्लिमांच्या खूप पूर्वीचा असून हे तिन्ही धर्म अब्राम्हिक म्हटले जातात.

जुना करार(ज्यूंचे बायबल): तोराह- म्हणजे आज्ञा,सूचना,कायदे इत्यादी. हा पाच पुस्तकांचा समूह मानला जातो.जेनेसिस,एक्झोडस,लेव्हीतीकस,नंबर्स,आणि ड्युटेरोनोमी.राबिनिक परंपरेनुसार तोराह्ची ही पाच पुस्तके (शेवटच्या ८  व्हर्सेसचा अपवाद सोडल्यास) मोझेसने लिहिली.मात्र अनेक विचारवंतांच्या मते याचे अनेक लेखक होते,आणि या सर्व गोष्टींना अनेक शतकांचा काळ लागला असावा. यातील पहिली चार पुस्तके ही चार वेगवेगळ्या विचारधारांकडून जमा करून एकत्र करण्यात आली. हे चार माध्यमे होती: जाहविस्त,इलोहिस्त,ड्युटेरोनोमीस्ट आणि प्रेषित. प्रथम चार पुस्तकांचा काळ हा  ईसपू.८-६ वे शतक मानला जातो. ड्युटेरोनोमी,ज्यात मृत्यू म्हणजे काय,वगैरे दिलेले आहे,हे पुस्तक सहाव्या शतकात लिहिले गेले.
    मोझेसनंतर इसैयाहा,जेरेमियाह,एझीकील,तसेच आणखी १२ लहान प्रेषितांचे(मायनर प्रोफेटस्) उल्लेख आहेत. या मायनर प्रोफेटसनीच नंतर मूळ ग्रंथावर इसपू.५३८-३३२ दरम्यान संस्करण केले.
ग्रेट  सिन्यागोग : ही ज्यूंनी भरवलेली एक प्रकारची धर्मपरिषद होती. यात १२० विचारवंत,संत,प्रेषित वगैरे लोक होते.काहींच्या मते ही संख्या ८५ इतकी होती.प्रेषित लोकांनी 'तोराह' ग्रेट असेंब्लीकडे सोपवल्या.त्या तोराह हगाई,झेचारीयाल्ड आणि मालाची यांनी धर्मगुरूंकडून स्वीकारल्या.मोझेसपासून ते इझीकील,ड्यानियल,इस्थर आणि बिब्लीयल कॅनोनमधील १२ लहान प्रेषित यांच्या धार्मिक साहित्यावर साधकबाधक चर्चा होऊन या लोकांनी "मिस्नाह"  या प्रार्थना निर्माण केल्या .त्याचे ३ भागात विभाजन केले: मिडारश्,हलाकोट आणि अग्गाडोट. सिन्यागोगच्या लोकांनी हा कॅनॉन केवळ पूर्ण केला नाही,तर त्यास वैज्ञानिक परंपरेची जोड देण्याचा प्रयत्न केला.
    इस्रायल ही भूमी ३००० वर्षांपासून ज्यू लोकांसाठी धार्मिक आणि पवित्र मानली जाते.इसपू.११ व्या शतकापासून ज्यू समूहांनी इस्रायलवर राज्य केले. नंतर असिरीयन ,बाबिलोनियन,पर्शियन ,ग्रीक,सास्सरीयन,आणि रोमन राज्यांच्या आक्रमणामुळे व त्यामुळे झालेल्या ज्यूंच्या इतर प्रदेशातील विस्थापनामुळे ज्यूंचा प्रभाव कमी कमी होत गेला. इसपू. १३८ साली रोमन साम्राज्याविरुध्द ज्यूंनी बंड केले पण त्यात त्यांना यश आले नाही.इस.६३८ मध्ये मुस्लिमांनी हा प्रदेश जिंकून त्यावर अगदी अलीकडे १५१७ सालापर्यंत राज्य केले.१५१७ साली हा प्रदेश ओट्टोमन राजाच्या अधिपत्याखाली आला.
इस्रायल येथे ज्यूंची अनेक महत्वाची धार्मिक स्थळे आहेत.यात ज्यूंचा राजा सोलोमनच्या पहिल्या व दुसऱ्या मंदिराचे अवशेष आहेत. या मंदिरांशी संबंधीत जो ज्यू समाज होता,त्याच्या अनेक मह्त्वाच्या परंपरा आहेत.यांचा संबंध आधुनिक ज्युडीसमशी जोडला जातो. मिस्नाह आणि जेरुसलेम तालमूद हे ज्युडीसमचे महत्वाचे धर्मग्रंथ इथे लिहिण्यात आले.ज्यूंच्या दुसऱ्या मंदिराच्या विध्वंसानंतर 'तिसऱ्या' मंदिराची इच्छा इझीकीलच्या पुस्तकात दिलेली आहे.हे मंदिर पुढे येणाऱ्या 'मसीहा'च्या काळात पूर्ण होईल असे म्हटले आहे.इतकेच नाही तर इझीकीलने त्याचे आर्किटेक्चरल प्लान्स सुध्दा पुस्तकात रेखाटले आहेत.
        ज्यू धर्मात जी प्रार्थना केली जाते,तिला अमिदा असे म्हणतात.अमिदा सारांशाने साधारणतः अशी असते
-' हे ईश्वरा, आमच्या पूर्वजांच्या अब्राहम,जेकब,इसाक च्या ईश्वर,हे सृजनकर्त्या ,सर्वकालीन परमेश्वरा, तू वायू आणि पाऊस बनवलास.तू प्रेमळ आणि करुणामय आहेस! तू मृतांना जिवंत  करतोस,आजाऱ्यांना बरे करतोस,तुझ्यासारखे दुसरे कोणी नाही. आम्हाला ज्ञान दे! आम्हाला अंतर देऊ नकोस.आमच्या पापांसाठी आम्हाला क्षमा कर.तुझे सर्व शत्रू लवकरच कापले जावोत.तू तुझ्या जेरुसलेममध्ये परत ये,आणि त्याला पूर्ववत कर!! आमचे मंदिर पूर्ववत बनू दे.' 
    प्रार्थना मध्येच तोडू नये किंवा प्रार्थनेत अडथळा येऊ नये असा नियम आहे.


ज्यूंची धर्मतत्वे : ज्यूंच्या धर्मतत्वांमध्ये श्रद्धा आहेच पण श्रद्धेपेक्षा कृतीला अधिक महत्व दिलेले आहे.विचारवंत,संत प्रेषित इत्यादी लोक होते.
१)देव आहे.
२)देव एकच आहे.
३) तो इटर्नल आहे.
४) फक्त देवाची (जेहोवाह) प्रार्थना करावी.
५)प्रेषितांचे शब्द खरे आहेत.
६)मोझेस हा महान प्रेषित होता.

७)इथे आणखी दुसरी कोणती तोराह( आज्ञा,सूचना ) अस्तित्वात नाही.
८)देवाला मानवाची कर्मे आणि विचार माहित आहेत.
९)देव चांगल्या लोकांना त्याचे फळ देईल आणि वाईट लोकांना त्यांच्या पापाची सजा मिळेल.
१०)"मसीहा" येणार आहे !! इत्यादी.


ज्यू धर्मातील आक्षेपार्ह विधाने आणि विसंगती: 
१)जुडाईसम मध्ये ईश्वर आणि इस्रायली लोक यांच्या नात्यालाच केवळ केंद्रस्थानी मांडले आहे. म्हणजे देव फक्त इस्रायली लोकांवर प्रेम करतो का?ईश्वर हा त्याच्या लोकांच्या बाबतीत प्रेमळ आहे,पण मार्ग सोडून गेल्यास तो 'बदला ' घेतो.
२) आदमपासून मानवतेची निर्मिती करून देवाने स्वतःची महानता दाखवून दिलेली आहे. जुन्या करारानुसार आदम हा पृथ्वीवरील प्रथम मनुष्य ६००० वर्षांपूर्वी अस्तित्वात आला. ज्यास वैज्ञानिकदृष्ट्या /मानववंशशास्त्रानुसार कोणताही आधार नाही.कारण मानवी जीवन लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे.
३)मसीहा ची संकल्पना: एके दिवशी मसीहा येईल आणि तो आपल्या ज्यू/इस्रायली लोकांचे उत्थान करेल.तेव्हा मानवतेने उंची गाठलेली असेल.भौतिक जगत नष्ट होईल. आणि तो आपल्या लोकांना देवत्वाला वा मोक्षाला घेऊन जाईल. या पूर्वी दुसरा कोणताही मसीहा येणार नाही.(तसा तो येणे शक्य नाही).कारण हे सर्वात शेवटी घडेल. या संकल्पनेचा अतिशय पगडा असल्यामुळेच मुळात ज्यू असलेल्या येशूने जेव्हा ज्युंच्याच धार्मिक परंपरांना धक्का देण्याचा प्रयत्न केला,तेव्हा त्यांनी येशूला अत्यंत क्रूरपणे क्रुसावर टोकदार खिळ्यांनी ठोकून ठार मारले. ज्यूंचे हे कृत्य जगातील काही अत्यंत क्रूर घटनांपैकी एक मानली जाते. या घटनेमुळे ज्यू धर्मावर आजपर्यंत आणि पुढेही मानवाचा इतिहास जोपर्यंत राहील,तोपर्यंत न मिटू शकणारा कलंक लागला.
४)प्रेषित असणे हा चमत्कार आहे.मोझेस हाच एकमेव प्रेषित होता.त्याचे शब्द हे प्रत्यक्ष ईश्वराचे शब्द होते.
५)जेहोवाहा हाच एकमेव देव आहे.
६)इस्रायलच्या राज्यासाठी राजाची आवश्यकता नाही.हे काम कोर्ट सुध्दा करू शकते.खरे म्हणजे कोर्टाचीही गरज नाही.देव आणि तोराह आपल्या लोकांना बरोबर एकत्र समाजात बांधून ठेवतील .
७)तोराह अपरिवर्तनीय आहेत.
८) आमच्या पापांसाठी आम्हाला क्षमा कर.तुझे सर्व शत्रू लवकरच कापले जावोत.तू तुझ्या जेरुसलेममध्ये परत ये,आणि त्याला पूर्ववत कर!! आमचे मंदिर पूर्ववत बनू दे.


ख्रिश्चन धर्म:

ज्यूंचा जुन्या करारात मसीहाबद्दल जी भविष्यवाणी केलेली आहे,तो मसीहा म्हणजे 'येशू ख्रिस्त' अशी सर्व ख्रिश्चन धर्मियांची गाढ श्रद्धा आहे.ख्रिश्चन हा शब्द मूळ ग्रीक शब्द 'ख्रिस्तोस' वरून आलेला आहे.त्याचा अर्थ आहे- अभिषिक्त/अभिषेक झालेला.हा धर्म येशूच्या धर्मोपदेशांवर,प्रवचनांवर,शिकवणुकींवर आधारलेला आहे.
    येशू स्वतः जन्माने ज्यू होता.इसपू.४ साली त्याचा जन्म झाला.त्याची आई मेरी ही कुमारी होती आणि तिच्या पोटी कौमार्याला बाधा न येत येशूचा जन्म झाला अशी श्रद्धा आहे.याचाही जन्म मोझेसप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत झाला.यावेळी ज्यूंवर रोमन साम्राज्याचे आधिपत्य होते.वयाच्या १२व्या वर्षी येशूने ज्ञान संपादन करण्यासाठी अरण्याचा मार्ग निवडला तेथे धार्मिक चिंतन मनन करत त्याला ईश्वरी साक्षात्कार झाला.एक मतप्रवाह असाही आहे,की वयाच्या १२ व्या वर्षापासून येशूने विविध प्रदेशात भटकंती केली.या काळात तो भारतातही येऊन राहिला.त्यानंतर वयाच्या ३० व्या वर्षी तो रोमला परत आला.याचवेळी त्याने जॉन या बाप्टीस्टकडून बाप्तिस्मा घेतला.योहन्ना जॉन याने 'आता धरतीवर लवकरच ईश्वराचे राज्य येईल" असे सांगत त्याला दीक्षा दिली.आणि येशूने लोकांना धर्मविषयक उपदेशपर प्रवचने द्यायला सुरुवात केली.त्याच्या उपदेशातल्या ५ आज्ञा याप्रमाणे होत्या-
१)हिंसा करू नका.
२)व्यभिचार करू नका.
३)जुन्या ग्रंथात (जुन्या करारात) म्हटले आहे की कुणी तुमचा डोळा फोडला तर तुम्ही त्याचा डोळा फोडा! पण मी(येशू) तुम्हाला सांगतो,की तुम्हाला कुणी एका गालावर मारले तर तुम्ही दुसरा गाल पुढे करा!!
४)शपथ घेऊ नका. फक्त हो/नाही म्हणा.
५)प्राचीन ग्रंथामध्ये(जुन्या करारात) म्हटले आहे की फक्त आपल्या(धर्मियांच्या)लोकांवर प्रेम करा! पण मी (येशू ) तुम्हाला सांगत आहे की आपल्या शत्रूवरही प्रेम करा!!
     येशूचे हे विचार निश्चितपणे आदर्श होते.त्यामुळे लोक त्याच्या प्रवचनांना जमू लागले. मात्र हे विचार आदर्श असले तरी तत्कालीन परंपरावादी ज्यू समाजाला आणि त्यांच्या परंपरांना धक्का देणारे ठरले.लोक येशूकडे आपली दु:खे घेऊन येत आणि तो त्यांच्या शारीरिक व मानसिक व्याधी बऱ्या करीत असे.लोक त्याला मसीहा मानू लागले.येशू म्हणायचा "धनिकांना स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही.आपली सारी संपत्ती गरीबांमध्ये वाटून टाका आणि माझ्यासोबत या!" 
  काही धर्मसिद्धांत: 
१)  येशुनेही एकेश्वरवाद मानला आहे.
२)मात्र याचवेळी त्याने त्रित्व सिद्धांतही सांगितला.पिता(ईश्वर),पुत्र (प्रेषित) आणि पवित्र आत्मा हे तिन्ही सारखेच अनादी,अनंत आणि सर्वशक्तिमान आहेत असे म्हटले आहे.
३)हे संपूर्ण विश्व ही ईश्वराचीच निर्मिती असून ईश्वराच्या राज्यात प्रवेश मिळवणे हे मानवी जीवनाचे ध्येय आहे.आणि मानवाला भौतिक शरीरापेक्षा  मानवी आत्म्याला मह्त्व दिलेले आहे.
४)कर्मसिद्धांत: पाप-पुण्यानुसार मानवाला स्वर्ग वा नरकाची प्राप्ती होते.
५)केलेल्या पापाची कबुली,ईश्वरावरील श्रद्धा,आणि प्रायश्चित्त यामुळे मनुष्य पापमुक्त होतो.
६)
           चर्च :
 सर्व ख्रिश्चन लोक मानतात की येशूने चर्चची स्थापना केली.त्याने सेंट पीटर याला प्रमुख धर्मगुरू बनवले.आणि त्याला सांगितले की हे चर्च शतकांपर्यंत राहील.सेंट पीटरचा मृत्यू रोम येथे झाला,त्यामुळे रोम येथिल बिशप यांना चर्चच्या अध्यक्षांचा आणि पृथ्वीवरील' येशूचे प्रतिनिधी' असा दर्जा मिळाला.
   ज्यू धर्मातील अनेक वाईट रूढींवर आघात केल्यामुळे त्याचेबद्द्ल ज्यू समाजात असंतोष पसरला.कट्टरपंथी धर्मगुरूंनी त्याला प्रचंड विरोध केला.विशेषतः त्याला लोकांनी 'मसीहा" मानणे त्यांना खटकले.त्यांच्या मते त्याच्यात मसीहा म्हणावे असे काहींही नव्हते.त्यांना फक्त आपल्या परंपरा आणि कर्मकांडावर विश्वास होता.आणि त्यासाठी ते आपल्या परंपरांना जपण्यासाठी हत्या करायलाही तयार होते.आणि मसीहा हा (जगाच्या)शेवटी येणार होता.स्वतः येशुनेही आपण ईश्वराचा पुत्र असल्याचे म्हटले होते.स्वतःला ईश्वरपुत्र म्हणवून घेणे तेव्हा घोर पाप मानले जात होते.
   येशूचा मृत्यू:
खरे म्हणजे येशू ज्यू धर्माला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेला असता,पण ते होणे नव्हते.त्याला विरोध करणाऱ्यांनी तो सुध्दा एक ज्यू धर्मीय आहे,हे समजून घेतले नाही.त्यांनी धर्माला त्यांच्या देवाचे हत्यार म्हणून वापरले.यामुळे येशू त्यांना म्हणाला की 'तुमचा बाप देव नसून राक्षस आहे!' यामुळे तत्कालीन ज्यू समाज त्याचा द्वेष करू लागला.ज्यांना त्याचे विचार पटले,ते त्याच्यासोबत गेले.ज्यू समाज आणि धर्मगुरू स्वतःच्या धर्मातील तत्वांनी इतके अंध झाले होते की त्यांना खऱ्या ईश्वराचा विसर पडला.येशुविरुद्ध क्रूर षड्यंत्र रचण्यात आले.तो इस.२९ मध्ये रोम येथे गेला असता त्याला पकडण्यात आले.त्यावेळी 'पिलातूस' हा रोमचा गव्हर्नर होता. पिलातूस प्रथम म्हणाला 'हा निर्दोष आहे' पण ज्यूंनी ऐकले नाही. रोमनांना या अंतर्गत धार्मिक वादाशी काहीच देणेघेणे नव्हते.मात्र त्यांना ज्यूंवर राज्य करायचे होते.त्यामुळे ज्यूंना दुखावले असते तर कदाचित ज्यूंनी रोमन साम्राज्याविरुद्ध बंड पुकारले असते.म्हणून त्यांनी येशूला बळी देण्याचे ठरवले.त्याचेवर स्वतःला मसीहा /देवपुत्र म्हणवून रोमन साम्राज्याविरुद्ध बंडसदृष्य हालचाली केल्याचा आरोप करण्यात आला.आणि त्याला कृसाची शिक्षा देण्यात आली.त्याला क्रुसावर खिळ्यांनी भोसकून ठार मारण्यात आले.मरतानाही येशूने आपल्या मारेकर्‍यांसाठी प्रार्थना केली की ईश्वराने त्यांना माफ करावे;कारण ते काय करीत आहेत हे त्यांचे त्यांनाच समजत नाही!
      मृत्युनंतर येशू ३ दिवसांनी पुन्हा उठून बसला(जिवंत झाला),असे मानले जाते.आणि यानंतर ४० दिवसांनी तो स्वर्गात गेला असे म्हटले जाते.


       येशूच्या मृत्युनंतर त्याच्या १२ शिष्यांनी त्याच्या शिकवणूकींवर आधारित नवीन धर्माचा प्रचार व प्रसार केला.यालाच ख्रिश्चन धर्म म्हटले गेले.सेंट पौलूस,अन्तीओक,प्रोफुस यांनी मासिडोनिया,एशिया मायनर आणि युनानमध्ये धर्माचा प्रसार केला.यानंतर रोम हे ख्रिश्चन धर्माचे मुख्य केंद्र बनले.ख्रिश्चन धर्माचा ग्रंथ अर्थात बायबलचा 'नवा करार ' हा इस. पहिल्या शतकाच्या शेवटी लिहिला गेला.नव्या कराराची आजमितीस विविध लेखकांनी लिहिलेली किमान सत्तावीस पुस्तके उपलब्ध आहेत.
सर्व  ख्रिश्चन मानतात की येशुनेच चर्चची स्थापना केली.पण ख्रिश्चन समुदायात नंतर फुट पडून अनेक पंथ निर्माण झाले.त्यामुळे त्यांची अनेक चर्चेस अस्तित्वात आली.
१)रोमन कॅथोलिक चर्च
२)ऑर्थोडॉक्स : जे अनेक शतकांपूर्वी रोमपासून वेगळे झाले त्या ख्रिश्चन लोक.
३)प्रोटेस्टंट
४)ऐन्ग्लीकन समुदाय: या समुदायावर प्रोटेस्टंटस् चा प्रभाव असला तरी हे स्वतःला प्रोटेस्टंटस् पेक्षा वेगळे मानतात.


प्रोटेस्टंटस् हे चर्चचे अदृश्य स्वरूप मानतात तर कॅथोलिक चर्च हे संघटन आणि दृष्य स्वरुपात असून कॅथोलिक चर्चला ते कॅथोलिक,एक,पवित्र आणि एपोजेल्स च्या काळापासून सुरु आलेले चर्च म्हणून अपेक्षेपेक्षा जास्त महत्व दिले जाते.

ख्रिश्चन  धर्मातील विसंगती :


१)एकेश्वरवाद आणि त्रिक सिद्धांत
२)व्हर्जिन मेरी संदर्भातील वाद: बायबलमध्ये अनेक मेरींचे उल्लेख आढळतात.येशूची आई मेरीला तिच्या आईवडिलांनी( जोव्हाकिम आणि अना ) तिच्या वयाच्या तिसऱ्या वर्षी एका देवळात अर्पण केले होते तिला साक्षात्कार झाला होता की तिच्या पोटी येशू जन्मणार आहे.अपोस्तोलिक काळानंतरच्या या काळाची मुळे काहींच्या मते पागन संस्कृतीशी जोडली गेली असल्याचे म्हटले आहे. त्या काळी शारीरिक संबंध मग ते वैवाहीकांमधील असले तरी त्यात पाप /संशयास्पदरीत्या बघितले जात होते..मेरीसाठी थिओतोकस अर्थात देवाची आई असा शब्दप्रयोग वापरण्यात आला होता.हा शब्द पहिल्यांदा इजिप्तच्या अलेक्झांड्रिया येथे ४ थ्या शतकात वापरण्यात आला. तर काहींच्या मते(मुख्यत्वेवरून नेस्तोरीअस-असिरीअन चर्च ऑफ द ईस्ट) येशू हा पूर्णपणे 'मानवी' होता.काही प्रोटेस्टंटस्च्या मते मेरीला येशूच्या नंतरही ती जोसेफसोबत असताना  मुले झाली होती.कारण बायबलमध्ये येशूच्या भाऊ आणि बहिणींचा उल्लेख आढळतो.मात्र कॅथोलीक्स त्यांना जोसेफची पूर्वीची मुले मानतात.मात्र बायबलमध्ये मेरी आणि जोसेफ एकत्र आल्याचा उल्लेख आढळतो (came together).
   म्याथ्यू म्हणतो जोसेफचे  हा मेरीशी येशूच्या जन्मापर्यंत शारीरिक संबंध नव्हते.तीने येशूला नैसर्गीकरीत्या जन्म दिला.ल्यूक २:७ -इथे येशूला मेरीचा प्रथम पुत्र म्हटले आहे.म्याथ्यू १२:१६: /फ.फ.१३:५५;५६- यात येशूच्या भावंडांचा उल्लेख आहे.ख्रिश्चन धर्मात लग्न ही गोष्ट आदर्श आणि जिची देवाने रचना केली अशी मानली जाते.ती स्त्री आणि पुरुषांनी (शारीरिक दृष्ट्या)एकत्र(as one flesh--wayne jackson in 'christian courier) येण्यासाठी असते.
मग ही गोष्ट जोसेफ -मेरी यांच्याबाबतीत का नाकारली जाते? ...(.....अपूर्ण )
[ टीप:हा लेख सध्या अपूर्ण आहे.तो संपूर्ण स्पष्टीकरणांसह संपादित होऊन  व्यक्त झाल्याशिवय पूर्ण  झाल्याशिवाय आणि नीट समजून उमजून घेतल्याशिवाय  कुणीही प्रतिक्रिया देऊ नये. कारण मला जे काय म्हणावयाचे आहे,त्याचा सारांश केवळ एवढ्याने व्यक्त होत नाही.धन्यवाद.](क्रमशः)
copyright (c) all rights reserved.