Tuesday, December 25, 2012

बढती का नाम दाढी !

सकाळी सकाळी दाढी करणे हा एक वैतागवाणा प्रकार आहे. सदर कारणास्तव आपले अनेक मित्र दाढी राखून आहेत. मीही कॉलेजात असताना ही आवड जोपासली होती. त्या काळात मला ' दाढीवाला ' म्हणून ओळखले जात असे; तर ते असो. दाढी अलीकडे पूर्वीपेक्षा बरीचशी सहजपणे करता येण्यासारखी गोष्ट झाली आहे. कारण विविध म्याच थ्री सारखी शार्प ब्लेड्स आज उपलब्ध आहेत. कॉलेजला असताना केलेली पहिलीवहिली दाढी आणि त्यातील थ्रील अजून आठवते. तेव्हा ट्विन ब्लेड्स वापरणे म्हणजे चेहऱ्याचे फारच लाड करण्यासारखे होते. म्हणून आम्ही मित्र पारंपारिक फावडे आणि विल्किन्सनचे ब्लेड वापरत असू. कधी कधी दोन तीन मित्र एका ब्लेडमध्ये शेअरिंग करून सामुदायिकरित्या दाढी करायचो. त्यासाठी लागणारे क्रीम, आफ्टरशेव लोशन आणि ब्रश हा एकच सर्वांसाठी पुरेसा असे. कारण तेव्हा एड्स सारखे आजार अजून एवढे पसरलेले नव्हते. आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षाच्या मित्रांना तो तसा असण्याची शक्यता निदान तेव्हा तरी नव्हती. सुरुवातीला सवय नसल्यामुळे हमखास रक्त येई.

नंतर सवयीने दाढी जमू लागली. त्यातही नंतर ब्लेडची एक कडा जास्त शार्प असते , आणि त्यातूनही पुन्हा त्या कडेची एक बाजू दुसरीपेक्षा अधिक शार्प असते, असे लक्षात आले. तीक्ष्ण कडा ओळखण्याची दृष्टी आली. पण अनेकदा घाईगर्दीत चेहऱ्याला जखम होईच. नंतर ट्विन ब्लेड्स वापरू लागलो. हे जरा बरे होते. थोडा कमी त्रासदायक होते. आणि एक ब्लेड महिनाभर सहज पुरत असे. पण होस्टेलवर सदर गोष्टी चोरीस जाण्यास पात्र ठरत. त्यामुळे त्या पुन्हा पुनः आणाव्या लागत.

परीक्षेचा आणि प्रेमभंगाचा कालावधी हा दाढी वाढण्यास उपयुक्त काळ असायचा. परीक्षक आणि पोरी ते 'समजून' घेत असत. एकदा पाच सात दिवस विनाकारण दाढी वाढली. सहज आरशात पाहिले असता लक्ष्यात आले, की आपल्याला दाढी बरी दिसेल. मग तेथून फ्रेंच कट दाढी ठेवायला सुरुवात केली. या दाढीची बरीच निगा घ्यावी लागते आणि नियमित त्याला तज्ञ न्हाव्याकडूनच कट मारावा लागतो , अन्यथा ती तुम्हाला 'पाहणाऱ्या' मुलींना हास्यास्पद वाटू शकते.यापेक्षा सरळसोट दाढी वाढवणे सर्वात सोपे ! मी इंटर्न असताना हा प्रकार सुद्धा नंतर मी अवगत करून घेतला. पण तो माझ्या चेहऱ्याला तेवढासा सुट होत नाही, असे काही तज्ञ लोकांनी सांगीतले. मग आता काय करावे असा विचार चालू असतानाच कॉलेजात एकदम सफाचट दाढी (मिश्या सुद्धा ) काढून टाकण्याची लाट आली. आणि माझ्या दाढीला निमित्त मिळाले.


त्याचे असे झाले निकम नावाचा एक चेनस्मोकर मित्र होता (म्हणजे अजून आहे तो ! :-) . तर याचे एका मित्राशी भांडण झाले. आणि त्या दुसऱ्या मित्राने याची मिशी झोपेतच उडवून टाकली. मग याने त्या पहिल्याची मिशी उडवली. आणि तिथून ही लागण सर्वत्र म्हणजे अख्ख्या कॉलेजात पसरत गेली. दोन पाच मित्रांचा घोळका दिसला की हे आता आपल्याला पकडून मिशी अर्धी उडवणार, अशी भिती वाटायची. म्हणून मी कोलेजला जाणे सुद्धा कमी करून टाकले. त्यावेळी मी शहरातील एका नामांकित सर्जनकडे प्रक्टिस करत होतो. हा बाबा खरेच चांगला सर्जन होता, पण हा ओ.टी. मध्ये फार आरडाओरडा करायचा. याला मी ऑपरेटीवला असिस्ट करायचो, बरेचदा हा बाबा एखादी छोटी आर्टरी अशा प्रकारे कापायचा की थेट फवारा उडत असे. पुन्हा स्वतःकडून आर्टरी कापली गेली म्हणून माझ्यावर वैतागायचा आणि आरडाओरडा करायचा. कधी कधी हातातील इन्स्ट्रुमेंटस सरळ वाटेल त्या दिशेला फेकून द्यायचा. मी म्हणायचो " मी बाहेर जाऊ का ?"
" शाब्बास ! मला असिस्ट तुझा आजा करणार का ?"
" पण तुम्ही स्वतःच्या चुकांसाठी दुसऱ्या लोकांना दोषी का समजता ?"

" ठीक आहे ! कौटरी घे पटकन ; फोर्सेप्स नीट पकड !"


प्रोसिजर संपल्यावर हाच बाबा पाठीवर हात ठेवून म्हणायचा
" अरे यार, मी टेन्शनमध्ये असतो ओटीत. तिथलं माझं बोलणं मनावर घेत जाऊ नकोस !"
हा मला लाभलेल्या काही गुरुंपैकी एक चांगला मनुष्य ! इतर वेळी हा अवांतर विषयांवर ,अगदी अध्यात्मावर चर्चा करायचा.याला वाचायचा कंटाळा असावा, कारण ह्याने तेव्हा माझ्याकडून 'लव्ह एन्ड बेली' वाचून घेतले. म्हणजे मी वाचायचो आणि तो ऐकायचा !

तर आता मूळ विषयाकडे वळतो. माझ्या या गुरूला दाढीमिशा नव्हत्या. पण तरुणांनी दाढी किमान मिशी तर राखावीच, असा याचा आग्रह असायचा. मिशीशिवाय मनुष्य म्हणजे अगदीच ' हे ' वाटतो असे याचे म्हणणे होते.
" सर, तुम्ही मिशी का ठेवत नाही?" असे मी घाबरत विचारल्यावर तो म्हणायचा
" मी आता म्हातारा झालो !"
 हे सर्व अवांतर सांगण्याचे कारण असे की एकदा दुपारच्या वेळात मित्रांचा ताफा आयुधांनिशी माझ्याकडे धावून आला. मी नुकताच जेवण करून बेडवर लेटलो होतो. दोघांनी मला पकडून ठेवले आणि एकाने हलकेच कुठल्यातरी ऑपरेशन थिएटरमधून चोरून आणलेल्या तीक्ष्ण कात्रीने माझ्या मिशीचा अर्धा भाग उडवला. आणि तत्काळ पळून गेले.
" अरे साल्यांनो, निदान पूर्ण तरी कापा !"
" तुझी तू कापून घे, आम्ही काय हजाम वाटलो कायबे ए येड्या ? "
" फुल्याफुल्यांनो , थांबा पळता काय हरामखोरांनो ?"
पण मित्र थांबले नाहीतच. मी चेहऱ्याचा अर्धा भाग झाकून नर्सला हाक मारली
" मला जरा सर्जिकल ब्लेड आणून दया एक "
" कशासाठी हवेय डॉक्टर ?"
" असेच पाहिजे, सहज !"
" किती नंबरचे देऊ ?"
" कितीपण नंबरचे द्याहो, लवकर दया जरा !"
" चेहऱ्याला काय झाले का डॉक ?"
" काहीच नाही झालेहो, ब्लेड देता ना ?"
तीने ब्लेड आणून दिले. मी वर माझ्या रुममध्ये आलो आणि उरलेल्या अर्ध्या मिशीवर निर्दयपणे ब्लेड फिरवले !


 पण आता अजून दाढी बाकी होती. अनेक महिन्यांत काम पडले नाही, म्हणून रेझर आणि ब्लेड्स आणण्याची गरज भासली नव्हती. आता मिशीशिवाय दाढी हे फारच विचित्र दिसत होते. मी जवळच्या सलूनमध्ये धावतच गेलो.
" सलाम वालेकुम !"
" वालेकुम अस्सलाम ! दाढी करायची आहे. "
" अच्छा, अच्छा, आप बैठीये. सिर्फ पांच मिनिट !"
" थोडे लवकर नाही का जमणार, जरा घाईत आहे !"
" ये क्या, इनकी दाढी हो गयी की बस आपही का नंबर है !"
हा मराठी मनुष्य मी त्याचेशी मराठीत बोलत असूनही माझ्याशी हिंदीत का बोलत होता,कळेना  ! एकदाचा माझा नंबर आला.
" कट मारनेका है क्या ?"
" पूर्ण उडवायची आहे."
" ठीक है, यह तो बहुत आसान है, हमारे लिये ! दाढी जितनी बडी उतना इझी होती है ! क्युंकी बाल काफी सोफ्ट होते है !"
मोजून पाच मिनिटांत त्याने माझ्या दाढीचा बळी दिला.

माझा हा अवतार माझ्यासाठी नवीन होता. सुरुवातीला समोरच्या आरशातील मनुष्य मीच आहे, की काय ओळखू येत नव्हते. तसाच हॉस्पिटलला धावत आलो.स्टाफस , आया , वार्ड बोइज सारेच हसले. त्यांनी पुरेसे हसून घ्यावे म्हणून तिथेच निर्विकारपणे थांबलो.
" हाहाहाहा ,छान दिसताय डॉक्टर  !" एक स्टाफ म्हणाली.

" धन्यवाद, आलोच मी !"
" हीहीहीही !"
"तुमचे हसून झाले असेल तर मी येतो आता, थोडा आराम करतो !"
" ओके सर, पण तुम्ही फार वेगळे दिसता आज !"
" वेगळा म्हणजे ? "
" काही नाही. सर आले की कोल करते.तुम्ही आराम करा. "
मी माझ्या रुममध्ये येऊन झोपी गेलो.
संध्याकाळी पाचला मोबाईलची रिंग वाजली
" सर आलेत "
" आलोच मी !"
मी फ्रेश होऊन खाली गेलो. ओपीडीत.
" गुड इव्हिनिंग सर !"
" कोण ? गुड इव्हिनिंग !"
" सर.."
" अर्र्रर्र्रर्र्र ,अरे हे काय केलेस तू ? "
" सर माझ्या मित्रांनी माझ्या मिशा उडवल्या मग मला दाढी करणे भाग होते !"
" काय बिनडोक मित्र आहेत तुझे ? आणि तू सुद्धा किती मूर्ख, त्यांना खुशाल मिश्या कापू दिल्यास !"
" सर मी नाही कापू दिल्या.."   मग मी सरांना घडला तो संपूर्ण किस्सा सांगितला.
" पण हे काही बरोबर नाही गड्या, तू अगदी निव्वळ हे दिसत आहेस ! जा माझ्यासमोर येऊ नकोस !"
" सर, पण माझा काय दोष आहे त्यात ?"
" कसली टुकार पोरं आहात रे तुम्ही ?ते तुझे मित्र आले की सांग मला ."
" ओके सर. "
" आणि तू आता निदान दोन तास तरी माझ्यासमोर येऊ नकोस !"
" ओके सर. मी फिरून येतो मग जरा !"
" शाब्बास, म्हणजे इकडे काही इमर्जन्सी आली, की तुला शोधत बसायचं का आम्ही ? इथेच बाहेर थांब पण मला थोबाड दिसू देऊ नकोस !"
क्षणभर वाटलं, "च्यायला काय हा विक्षिप्त मनुष्य आहे ! "पण दुसऱ्याच क्षणी गुरूविषयी असे विचार चुकीचे आहेत, हे जाणवून मी मित्रांना मनातल्या मनात अनेक शिव्या घातल्या.
सदर प्रकारानंतर माझे इतर दोन मित्र पोरे आणि भूषण मला भेटायला आले. त्यावेळी सर पेशंटस आटोपून ओपीडीत वाचत बसलेले होते.
" अरे, स्वागत मित्रहो, खूप दिवसांनी इकडे ?"
" चल चहा मागव !"
" होरे, च्यायला बसा तर खरं !"
" बाहेरच जाऊ चल. तुझा तो डेंजर बोस गेला का घरी !"
" ओपीडीत बसलाय बाबा !"
" च्यामायला जाकी म्हणावं घरी; जेवण बिवन कर म्हणा घरी जाऊन !"
" हळू बोलरे, च्यायला ऐकलं सरांनी, तर तुम्हाला दोघांना हाकलून देईल !"
" दाढीमिशीवरून लई छळलं म्हणे तुला ?"
" जाऊदेरे आपली पोरेच साली टपोरी आहेत !"
  बॉसला आमच्या बोलण्याची चाहूल लागली की काय, पण तो बाहेर आला.
" अच्छा, हे मित्र का तुझे ?"
" हो सर, ओळख करून देतो - हा पोरे आणि हा भूषण !"
" नमस्कार सर !"

" नमस्कार !"
" तुम्हाला काही अक्कल बिक्क्ल आहे की नाहीरे ?" बॉसने थेट मुद्याला हात घातला
 " छेछे, सर हे अतिशय चांगले , गुणी मित्र आहेत !"
" तू मध्ये बोलू नकोस !"
" सर, पण आम्ही याच्या दाढी मिशांशी काही कर्तव्य नाही. आम्ही कशाला उडवू ? ते दुसरे मित्र होते."
" मला तर तुम्ही पण तसेच भामटे वाटता !"

" तुम्हाला वाटते त्याला आम्ही काय करणार ?"
यानंतर माझ्या ने बॉसने मित्रांची अशा प्रकारे चांगली पंधरा मिनिटे बिनपाण्याने केली. मित्र वैतागून अक्षरश: कोपरापासून नमस्कार करून निघून गेले ! बॉस सुद्धा घरी निघून गेला. मी मित्रांच्या मागे धावत गेलो.
" माफ करा मित्रहो, माझ्यामुळे तुम्हाला थोडा त्रास झाला..चला ,चहा तरी घेऊ !"
" अबे जा तिकडे !  फुकट पण नको तुझा चहा ! च्यामायला , आम्हाला चहा प्यायचा म्हणून येतोक्काय आम्ही हिकडं ? "
" ए सुन्या, त्या तुझ्या बॉसला समजावून सांग जरा, कोणालापण काहीपण बोलत जाऊ नकोस म्हणा, च्यामायला ! तुझा बॉस म्हणून सोडून दिला त्याला. तुला काय अशे तशे वाटलो काय म्हणा,काबे येड्या !"
" जाऊदे यार गुरु आहे. "
" तुझा असेल गुरु आमचा नाही, चल जातो आम्ही !"


यानंतर माझ्या बॉसने २-३  दिवस माझा जो छळ मांडला तो अवर्णनीय आहे. ओटीत असताना हा बाबा बाहेरून आलेल्या सर्जन्स आणि अनेस्थेतिस्त लोकांना म्हणत असे
" बघा आमच्या डॉक्टरांनी काय केले आहे ! डॉक्टर, मास्क काढ बर !"
" सर, आता त्यात काय एवढे ?"
" नाही, दाखव थोबाड जरा !"

किमान दहा वेळा तरी मी मास्क काढून चेहरा दाखवला असेल. मी नाईलाजाने मास्क काढला की मग ते लोक मला हसत आणि हा बाबा माझा आणि माझ्या मित्रांचा उद्धार करत असे. त्यातील एखादा सरांच्या अपरोक्ष सांत्वन करून जाई :
" रिल्याकस, सरांचे फार मनावर घेऊ नकोस ! या वयात एवढं चालायचंच ! पण तुला दाढीच चांगली वाटते; पुन्हा वाढव. बढती का नाम दाढी !"

चार पाच दिवसांनी पुन्हा दाढीचे खुंट दिसायला लागले आणि मी दाढी जोमाने वाढवण्याचा निश्चय केला; ती वाढवली सुद्धा ! पण नंतर मला तो माझा प्रिय छंद काही कारणाने सोडून द्यावा लागला. त्याची कथा नंतर केव्हातरी !  :-)

Thursday, November 15, 2012

ब्ल्याक होल

ब्ल्याक होल

by डॉ.सुनील अहिरराव on Friday, November 16, 2012 at 12:35am ·

आपण जात आहोत त्या रस्त्यावरून हजारो, लाखो, करोडो लोक गेले असतील कधी समांतर , कधी वेडेवाकडे, कधी रस्त्यांना छेदत. ते आज इथे नाहीत पण मी पाहतो आहे, त्यांच्या पाउलखुणांच्या रेषा : एकमेकांत इतक्या रुतलेल्या घट्ट , एकसंध, एकजीव ! किंवा वेगवेगळ्या धातूंचे असंख्य तुकडे वितळवून घडवलेला अजस्त्र घण ! आणि त्यात प्रत्येक कणाचे सूक्ष्म अस्तित्व अजून तसेच. प्रत्येक घावागणिक कितीक माणसांच्या आठवणी आणि त्यांच्या भावना प्रेम, आनंद, दु:ख ,वासना, विखार आणि कुठले कुठले अंदाजापलीकडच्या अनंत विचारांचे वेडेवाकडे लोह्तप्त गुंते ! तो अजून वाहतोच आहे प्रचंड गर्दी उरात साठवून आणि लोक पुन्हा त्यावरून तसेच जात आहेत,आपापल्या भावना, विचार, खुणा अजाणतेपणी पेरून. याच रस्त्यावरून कितीक लोकांचे अनेकदा प्रवास झालेले, आपल्याच खुणांविषयी अनभिज्ञ लोक आणखी काही रेषा इथे सोडून जातात पुन्हा पुन्हा... त्यात मीही एक !

इथेच कैकदा उधळलेला गुलाल आणि विरून गेलेल्या मिरवणूका. .. कधी अल्लड प्रेमी हातात हात घालून हितगुज करीत गेलेले. कधी धावत्या गाडीत विनयभंग आणि बलात्कार सुद्धा ! असंख्य वाहने , असंख्य अपघात आणि सांडलेले रक्त..सरून गेलेल्या अंत्ययात्रा...या सगळ्यांचा एकसंध गठ्ठा गिळंकृत करणारा रस्ता ब्ल्याक होल सारखा भासतो आहे !

Tuesday, September 25, 2012

क्षण कोसळते ...

क्षण कोसळते...
by डॉ.सुनील अहिरराव on Wednesday, August 15, 2012

कोण कुठल्या क्षणांचे क्षणाक्षणाला बदलणारे अनंत संदर्भ मेंदूत भरून जगत असतो आपण ! कुठून कसा ,कुठला क्षण कालौघातून ओघळेल आणि कोसळेल आपल्यावर, सांगता येत नाही. त्या क्षणाच्या कोसळण्यावर आपल्या अस्तित्वाचा डोलारा उभा असतो. तो कोसळेपर्यंत वाट पाहणे इतकेच आपल्या हाती... इथेच आशा नव्याने जन्म घेत जाते. त्या येणाऱ्या क्षणात कदाचित असणार असतो आपले कोसळते अस्तित्व सांभाळणारा एक दीपस्तंभ ! मात्र एक निश्चित की त्या त्या क्षणांना आपण रोखू शकत नाही. .पुन्हा नव्या संदर्भांचे ओझे घेऊन एक प्रवास सुरु राहतो ... त्या त्या क्षणांच्या कोसळण्याची वाट पाहणे इतकेच आपल्या हाती ! त्याने जे दान तुम्हाला दिले ,ते निमुटपणे स्वीकारण्याशिवाय पर्याय तरी कोणता ?

सुखाला जसे विविध रंग असतात, तसेच दु:खाच्याही अनंत छटा... ! प्रत्येकाचं दु:ख मोठं आणि परद:ख शीतलं ..आपल्या दु:खाला श्रोता मिळू शकतो पण आपल्या स्वतःशिवाय दुसरा सोबती मिळत नाही. ती तीव्रता आपली आपण भोगायची : कधी सुन्न,बधीर व्हायचं; कधी हुंदके देऊन रडायचं, कधी निगरगट्टपणे कोरडेपणाने आपल्याच दु:खावर भीषण हसायचं ! आपल्या इवल्या डोळ्यांइतकच आपलं आकाश...त्यात जमतील तशा वेड्यावाकड्या रेषा आखायच्या. काही आकृत्या ,चित्रे रेखाटायची..ती सुद्धा अंगावर धावून येणारी..त्याच एब्स्ट्राक्ट आकारांत हरवून जायचं आणि त्याच त्या रेषांच्या रिंगणात फिरत रहायचं दरक्षणी कोसळत्या नव्या क्षणाच्या प्रतीक्षेत ! सगळंच म्हटलं तर आखीवरेखीव म्हटलं तर सगळंच विस्कळीत ...

असे असंख्य गुंते आणि त्यांची वेडीवाकडी भेंडोळी जमा करत चाललो आहोत आपण. कधी सुटलेच गुंते तर - वरवरचे वाटतात सुटल्यासारखे ; बहुधा हे सुद्धा तितकेसे खरे नाहीच ! एक धागा उकलताना नकळत त्याचा एक नवा गुंता ,एक नवे भेंडोळे तयार होते. आयुष्य म्हणजे साऱ्या क्षणांच्या संदर्भाचं एक मोठं भेंडोळं आणि आपण त्यात अडकलेले क्षुद्र जीव. अचानक हे धागे कधी स्वतःच उकलले जातातही ... क्षणांचे, वर्षांचे संदर्भ उलटून गेल्यावर नामोनिशाणही उरत नाही. ही उकल होण्यासाठी पुन्हा त्या क्षणाच्या कोसळण्याची वाट पाहणे ; मात्र ती तशी होणे न होणे त्या त्या क्षणावर अवलंबून... ! त्या क्षणाच्या बरसल्यानंतरचा प्रतिक्रियेचा क्षण तरी आपला असतो का, प्रश्नच आहे कारण एखादा क्षण कोसळताना मिटवून जातो आपलं असणं, तेव्हा पुढचा क्षण वाट्याला येत नाहीच...मग एक अनंत प्रवास अपरिहार्यपणे...
- डॉ. सुनील अहिरराव

Friday, February 24, 2012

आपली कागदी संस्कृती

आपण जन्माला येताना काय सोबत आणतो?                            
प्रश्न तसा साधाच पण उत्तर कठीण आहे.कुणी म्हणतील भाग्य,कुणी म्हणतील प्राक्तन,कुणी म्हणेल मन वगैरे वगैरे.उत्तरं सापेक्ष असणार,हे खरेच आहे.पण आपल्या सध्याच्या संस्कृतीबद्दल बोलावयाचे झाल्यास मी म्ह्णेन की आपण जन्माला येताना 'कागद' घेऊन येतो! होय,birth certificate नावाचा कागदाचा एक तुकडा! अन् येथूनच आपलं कागदी आयुष्य सुरु होतं. हा कागद तुम्हाला तुम्ही एकदाचे जन्माला आलेले आहात हे बजावतो! तुमच्याजवळ हा कागद नसेल तर मग तुमचं काही खर नाही कारण तुम्ही जरी समोर जिवंत दिसत असलात तरी त्याला पुरावा काय बाबा? मग सारचं अडत जात.तुम्हाला बालवाडीत किंवा नर्सरीत प्रवेश मिळत नाही.मग तुमचे आईवडील बिचारे कोणत्यातरी डॉक्टरचं तुमच्या जन्माचं खोटं सर्टीफिकेट आणतात.ते घेऊन तलाठी वा म्युनिसिपल कार्यालयात लाच देऊन खोटा जन्मदाखला घेतात.अश्याप्रकारे एकदाचे तुम्ही बालवाडीत वा तत्सम 'शाळेत' जाता.मग वर्षभर कागदांचा खेळ चालतो-त्यात तुमच्या वडिलांचा उत्पन्नाचा दाखला,त्यांचा जातीचा दाखला,त्यांचा रहिवासाचा पुरावा क्वचित वेळा तुमच्या वडिलांचा विवाहदाखला सुद्धा मागितला जातो.दरवर्षी तुम्ही पास झाल्याचा एक कागद मिळवून वरच्या वर्गात जाता आणि तुमचा कागदांचा संग्रह वाढत जातो. तुमच्याजवळ जेवढे जास्त कागद,तेवढे तुम्ही great!एकदाचे तुम्ही १२ वी वगैरे झालात की मग तर कागदांचा भला मोठा पेटाराच तयार होतो.त्यात खरे खोटे मात्र सारे अधिकृत कागद असतात आणि हे फक्त तुम्हाला किंवा तुम्ही ज्या ठिकाणच्या ज्या सरकारी वा खाजगी अधिकाऱ्याकडून मिळवलेले असेल ,त्यालाच माहित असतात.नंतर असंख्य कागदांचा अभ्यास करून तुम्ही एखाद्या ठिकाणी कागदी नोटा देऊन नोकरीला चिकटता.आणि आयुष्यभर कागदावर कागद जमा करत राहता! नंतर तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्हाला तीच कागदांची उठाठेव करत राहता.तुम्ही तुमच्या आजोबांचा जन्मदाखला सुद्धा मिळवता,कारण आता तुम्ही बरेच अनुभवी असता.कोठून काय आणि कसे मिळते,हे तुम्हाला आता चांगलेच माहित झालेले असते.स्वतःच्या आजारपणाचा खोटा दाखला देऊन तुम्ही वैद्यकीय रजा आणि बिल सुद्धा मिळवता,आणि त्या रजेच्या कालावधीत मस्त कुटुंबासोबत फिरून बिरून येता !

खाजगी वा सरकारी कार्यालय कोणतेही असो.लाच दिल्याशिवाय तुमचे काम नाहीच होत! शाळेत जुन्या मास्तरांनी शिकवलेले धडे चोरी करू नये,खोटे बोलू नये,सर्व बंधू समभाव ,अडचणीतल्या मित्रास मदत करावी वगैरे आपण हळूहळू विसरत जातो.श्यामची आई वाचून हुंदके देऊन कधीकाळी रडणारे आपण आज अगदी निगरगट्ट झालो आहोत.स्वातंत्र्यासाठी बलीदान देणाऱ्या वीरांच्या कथा ऐकून स्फुरण चढायचे आपल्याला. ते आपण थंड रक्ताचे झालो आहोत.आपण स्वातंत्र्यवीरांना श्रध्दांजली वाहतो,तेव्हा आपलं लक्ष त्या त्या वीरांच्या वा प्रतिमेकडे कमी आणि फोटोग्राफरकडे जास्त असतं.काही सुशिक्षीत सुसंस्कृत महाभाग तर शाळेत मुलांना सोडायला जाताना राष्ट्रगीत सुरु असेल तरीही कुणाशीतरी मोबाईलवर बोलताना आढळतात.किंवा त्यांची एखाद्या समकक्ष सहकाऱ्याशी चर्चा चाललेली असते-त्यांचे विषय असतात-'सहाव्या वेतन आयोगाच्या  फरक इतका मिळाला.वेतनश्रेणी ही मिळाली ,शेयर्समध्ये किती गुंतवले,इन्कमटॅक्स वाचवण्यासाठी पॉलिसी घेतली वगैरे वगैरे..किती संकुचित झालो आहोत आपण! रोज भ्रष्टाचाराचा एक नवीन धडा आपण अंगी बाणवत चाललेलो आहोत.कुणाचे होवो न होवो,आपले काम आपल्याला करून हवे असते.त्यासाठी लाच द्यायला आपण सतत तयार असतो.आणि घेणारेही.

या देशात बोगस रेशनकार्ड २०० रुपयात आणि एका दिवसात मिळते.पण प्रामाणिकपणे मिळवायला जाल तर किती दिवस,महिने  किंवा वर्षेपर्यंत थांबावं लागेल,सांगता येत नाही.'उद्या या,आठवड्याने या,कार्ड शिल्लक नाहीत,त्या अमक्याला भेटा,पुढ्च्या महिन्यात या' अशी उत्तरे मिळणार!अश्या प्रकारे दहा चकरा मारल्यानं वैतागून तुम्ही त्या ऑफिसात जाणेच बंद करून टाकता.या  देशात एकवेळ पासपोर्ट लगेचच मिळतो,पण सर्वसामान्यांना आवश्यक रेशनकार्ड मात्र मिळत नाही.हे सामान्य माणसाचं आणि ज्या देशात तो राहतो,त्या भारत देशाचं मोठं दुर्दैव आहे.अत्यंत क्षुल्लक गोष्टींसाठी आणि गरज म्हणून आपण लाच द्यायला सुरुवात करतो का?कदाचित
होय! पूर्वी चकरा मारून मारून आपण लाच द्यायला उद्युक्त होत होतो.आता काम आणखीच सोपे झाले आहे.आता लाचेचे रेट्स ठरलेले आहेत.तेवढे पैसे 'थ्रो प्रॉपर च्यानेल' दिलेत की बाबू लोक तुम्हाला आवश्यक ती सर्व कागदपत्रे घरपोच देतात.ज्यांना हे जमत नाही,त्यांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.डार्विनच्या सिद्धांतानुसार तुम्ही आपल्या कागदी संस्कृतीत जगण्यास नालायक ठरता.

जग झपाट्याने बदलत आहे. पत्राची जागा १२ -१५ वर्षांपूर्वीच मोबाईलने घेतली आहे.कागदपत्रांची देवाणघेवाण फ्याक्स,इमेल्सनी केली जात  आहे.व्हिडीओ कॉन्फरनसिंग, लाइव चाट,वगैरे प्रकार आपल्यासाठी नेहमीचे गरजेचे झाले आहेत.विदेशात सर्व सरकारी कार्यालयांतून अश्या माध्यमांचा वापर खूप पूर्वीपासून केला जात आहे.भारतातही आता व्यवहार ऑनलाईन होऊ लागले आहेत.आणि खाजगी कार्यालयांमधून त्याचा वापर अत्यंत प्रभावीपणे केला जात आहे.मात्र सरकारी कार्यालयांच काय? या सर्व सुविधा असूनही कामाला गती का मिळत नाही?कारण एकच आहे-आणि ते म्हणजे आपण आपल्या कागदी संस्कृतीत अडकून पडलो आहोत. आजपर्यंत किती लोकांनी ७-१२ चा उतारा ऑनलाईन मिळवला आहे?काही मोजक्या सरकारी बँका सोडल्यास इतर कार्यालयांच्या ठिकाणी तुमची निराशाच होणार!न्यायालयांचे उदा.घेऊ.प्रत्येक कोर्टात इंटरनेट,फ्याक्स इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.त्यांचा वापर केला जातो का? केला जात असल्यास केवळ अपवादानेच.  आरोपीला समन्स बजावताना कोर्टाच्या सही-शिक्क्यासह असलेले बंद पाकीट लागते.त्याशिवाय पोलीस ते बजावत नाहीत. कोर्टाने त्या त्या पोलीस स्टेशनला तसा फ्याक्स किंवा इमेल पाठवला तर?आणि आरोपीच्या  मोबाईल,ईमेल आयडीवर सरळ सम्पर्क साधला तर काय होईल? तो पळून पळून कुठे जाणार? तुम्हाला त्याच्या मोबाईलचे लोकेशन काही सेकंदात समजू शकते.मात्र त्यासाठी  संबंधित कर्मचाऱ्याना  या सर्व गोष्टींचे ज्ञान असायला हवे.असे ज्ञान असूनही किती लोक त्याचा वापर करतात?आजची न्यायालयांची परिस्थिती फार वाईट आहे;असे नाईलाजाने म्हणावे लागते.किती जणांना न्याय मिळतो?आणि किती जणांना 'पुढची तारीख ' मिळते? हे सर्व कशामुळे घडते?
फक्त कागदी घोडे नाचवणाऱ्या यंत्रणेमुळे;आपल्या कागदी संस्कृतीमुळे!